Sunday, December 25, 2022

ठेच...

        नातं म्हणजे काय?... माझ्यामते नातं म्हणजे विश्वास. मग ते कोणते का असेना. नात्याच्या असंख्य व्याख्या आहेत पण त्यातील एक, नातं म्हणजे दुसऱ्या कडून ठेवलेली अपेक्षा. त्या दोन माणसांत कितीही मतभेद असले तरी एकमेकांच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टी एकमेकांना सांगणे आणि ते ही मोकळेपणाने.जेव्हा काही गोष्टी लपवल्या जातात आणि मग त्या दुसर्‍या कोणाकडून तरी समजतात तेव्हा मनाला लागते ती "ठेच". 

         ठेच लागते त्या मनाला, त्या विश्वासाला, त्या नात्याला. मग ते नाते नावापुरते राहते. त्यातला मोकळेपणा, आनंद निघून गेलेला असतो, विरून कुठेतरी. विश्वासाला गेलेला तडा पुन्हा पूर्ववत करणे कठीण होऊन बसते. यामुळे मने दुरावतात. आपण एवढा विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने अमुक एक गोष्ट नाही सांगितली याचा अर्थ सरळ आहे की त्या व्यक्तीचा आपल्यावर तेवढा विश्वास नाही यात आपणच कुठेतरी कमी पडलो. असा विचार आपण करू लागतो आणि एक माणूस गमावून बसतो. 

        नातं, विश्वास या गोष्टींना तडा तेव्हाच जातो जेव्हा आपण त्या नात्याकडून अपेक्षा ठेवतो. ती व्यक्ती अशीच वागली पाहिजे असे वाटते आणि मग वाट्याला येतो तो फक्त अपेक्षाभंग. 

     पण मग अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का? नाही ठेवल्या तर उत्तमच पण मग नातं समृद्ध कसं होणार आणि अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग होणार. डोळ्यातल्या अश्रूंना आणि हातातल्या लेखणीला वाट मिळणार. अशा गोष्टी बोलून दाखवल्या तर दुरावा आणखी वाढणार आणि नात्याच्या उरल्या सुरल्या गाठीही सैल होणार, सुटणार, मग का बोलायचे? 

      ते म्हणतात ना की काळ सगळ्यावरचे औषध आहे. दिवसागणिक मनाची अस्थिरता कमी होईल आणि राग कमी होईल. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालत रहायचे. नाते पुन्हा नव्याने सुरू करण्याचा विचार करायचा. हळूहळू दुःख बाजूला सरते आणि उमेद साथ देते. कदाचित तेच नातं पुन्हा जुळू शकेल फक्त ते नव्याने सुरू करताना मागचे सर्व विसरून दोघांनीही ते स्वीकारले पाहिजे म्हणजे ही नात्याला नव्याने फुटलेली पालवी हे नातं समृद्ध करेल. 

"नाजूक, अलवार नात्याला जरी बोचला काटा,              

नयनी अश्रूंना मिळाल्या वाटा, 

मनात उठल्या अस्थिरतेच्या लाटा, 

काळ करेल सारे अलबेल, हा विश्वास माझा नाही ठरणार खोटा." 

                                                                       - श्वेता

    

No comments:

Post a Comment