Monday, January 2, 2023

पुरुष आणि प्रकृति...

            आपल्या दैनंदिन जीवनात काही शब्द फारच क्वचित वापरले जातात, त्यापैकी हे दोन शब्द "पुरुष आणि प्रकृति".

          आपण हे शब्द वापरतो पण वेगळ्या अर्थाने. अर्थात पुरुष म्हणजे Male candidate आणि प्रकृति म्हणजे तब्येत, Health या अर्थी. पण या दोन्ही शब्दांचे व्यापक दृष्टिकोनातून पाहता आपल्याला खूप वेगळे अर्थ लक्षात येतात.
          या जगात, अंतरिक्षात, वातावरणात एका ईश्वरी शक्तीचा, तत्वाचा वास आहे, ज्या तत्वाचे आपण अंश आहोत. आपल्या भवतालच्या सगळ्या गोष्टी याच तत्वापासून बनलेल्या आहेत. पण हे ईश्वरी तत्व आहे तरी काय? ते कशापासून बनले आहे?


           याच उत्तर आहे "पुरुष आणि प्रकृति". पुरुष आणि प्रकृति म्हणजे शिव आणि शक्ति. हे ईश्वरी तत्व यापासून बनले आहे. या संसाराची निर्मिती तीन गुणांपासून झाली. "सत्व, रज आणि तम" अर्थात सात्विक, राजस आणि तामस गुणांचा मिलाफ म्हणजे हे जग. ज्याचा निर्माता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि हरणकर्ता शिव ही त्रिमूर्ती आहे.
            पुरुष आणि प्रकृतिच्या परस्पर संबंधातून या जगातल्या वास्तु, वस्तू, जीव, जंतू यांची निर्मिती झाली. या दोघांच्या अतीव सामंजस्यातून या जगाचे संरक्षण होते. यांच्यातील असंतुलनामुळे अनेक संकटांची निर्मिती होते. म्हणजेच या जगाला सांभाळणारी दोन तत्त्वे आहेत ही "पुरुष आणि प्रकृति".
             या दोन तत्वांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक घटनेत याचा विचार होणं पर्याप्त आहे. आपल्या नकळत आपण या तत्वांचा आधार घेत असतो. या दोन्ही अतिशय परस्परपूरक गोष्टी आहेत.
             घडणारी प्रत्येक घटना हे पुरुष तत्वाचे रूप असते तर ती घटना घडण्यामागची कारणे आणि घडल्यानंतर होणारा परिणाम ही प्रकृतिची रुपे आहेत. उदा. वादळ हे पुरूष तत्वाचे रूप आहे तर वादळापूर्वीची हवामानाची स्थिति आणि वादळानंतर पडणारा पाऊस ही प्रकृतीची रुपे आहेत.
          या दोन्ही तत्त्वांच्या आधारभूत संतुलनातून हे सृष्टीचक्र चालते आणि या अफाट सृष्टीचा आपण एक छोटा अंश आहोत. अस्तित्वाचा हा आभास आपल्याला पुरुष आणि प्रकृतिच्या अथांग, निर्मळ, निराकार रूपाची महत्ता लक्षात आणून देतो. आपल्या अहं ला धक्का लावत आपण या विस्तृत जगाचा भाग बनूया. या जगाच्या पसार्‍यातील आपण एक सूक्ष्म अस्तित्व आहोत हे लक्षात घेऊयात. या तत्त्वांचा सन्मान करूया. जग सुंदर आहे ते अनुभवूया आणि आणखी सुंदर बनवूया.


                                                                   -श्वेता. 

No comments:

Post a Comment